---Advertisement---
नवी दिल्ली : देशात सध्या सुरु असलेली टोलप्रणाली एक वर्षात पूर्णपणे बंद केली त्याजागेवर जाईल, इलेक्ट्रॉनिक्स टोल वसुली पध्दत लागू केली जाईलय यामुळे वाहनचालकांना टोलनाक्यावर थांबावे लागणार नाही तसेच लांबचलांब रांगेपासून त्यांची सुटका होईल, अशी महत्वपूर्ण धोरणात्मक घोषणा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत केली.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात गडकरी म्हणाले की, देशातील विद्यमान टोल व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तन केले जाईल, टोलकपात आता स्वयंचलित (ॲटोमॅटिक) पध्दतीने होईल, टोल नाक्यावरुन आता कोणत्याही अडथळ्याशिवाय वाहनचालकांना प्रवास करता येईल.
देशातील वाहतूक प्रणाली डिजिटल केली जाईल, वाहने थांबवून टोल वसूल करण्याची पध्दत बंद केली जाईल, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक टोल वसुली सध्या प्रायोगिक स्तरावर देशातील दहा ठिकाणी लागू करण्यात आली आहे, या प्रणालीला मिळणारा प्रतिसाद पाहून ती येत्या वर्षभरात संपूर्ण देशभर लागू केली जाईल.
नव्या व्यवस्थेतून देशातून टोल नाके पूर्णपणे बंद होतील, तसेच गाड्या धावत असतांना महामार्गावरच डिजिटली टोल कापला जाईल. यासाठी वाहनांना थांबण्याची गरज पडणार नाही, असे ते म्हणाले. डिजिटल टोल प्रणाली देशात लागू झाल्यानंतर देशातील वाहतूक अधिक गतिमान होईल, तसेच प्रवाशांचा वेळेचीही बचत होईल, असे ते म्हणाले.
नॅशनल पेमंट कार्पोरेशन ऑफ नॅशनल इंडियाने (एनपीसीआय) इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्राम बनवला असून तो इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीसाठी युनिफाईड इंटरऑपरेबल प्लॅटफार्म आहे.
हायड्रोजन भविष्यातील इंधन
दिल्लीतील वाढत्या प्रक्षणाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका असून हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याचे गडकरी यांनी अन्य एका प्रश्नावर स्पष्ट केले. टोयोटाची मिराई ही नवीन गाडी हायड्रोजन इंधनावरच धावणारी आहे. माझ्याजवळ टोयाटोची मिराई आडी असून ती हायड्रोजनवर धावते. ही गाडी मर्सिडिजसारखा आनंद देते. जपानी भाषेत मिराई या शब्दाचा अर्थ भविष्य असा आहे, असे गडकरी म्हणाले.









