तरुण भारत लाईव्ह । जळगाव : मुलांच्या कौशल्य वर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्या चेन्नई येथील एसआयपी अकादमी आणि जळगावच्या पर्यावरण शाळेच्या वतीने खेडी (कढोली) शिवार, ता. एरंडोल येथे मियावाकी वनसंवर्धन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवार, 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजता होईल.
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही एल. माहेश्वरी, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे, एस.आय.पी. अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश व्हिक्टर, संचालक सीबी शेखर, संचालिका सरला कुलशेखरन, शिवाकाशी येथे पंचविसपेक्षा अधिक मियावाकी वन निर्माण करणारे सेलवाकुमार उपस्थित राहणार आहेत.
गेल्या चार महिन्यापासून या प्रकल्पाचे प्रारंभिक काम सुरू आहे. या उपक्रमाला भारत विकास परिषद, बळवंत नागरी सहकारी पतपेढी, विद्यापीठाच्या एनएसएसचे सहकार्य लाभले आहे.
लोकसहभागातून हा प्रकल्प येत्या 11 जुलै रोजी साकारत असून या ठिकाणी साडेसात हजार स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. याप्रसंगी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन या उपक्रमाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.