---Advertisement---
एकेकाळी हिमालयाचे पाणी सर्वांत शुद्ध असल्याचे मानण्यात येत होते. मात्र, आता हिमालयातील ढग विषारी जड धातू वाहून नेत आहेत. त्यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. विशेषतः लहान मुलांसाठी हे जास्त धोकादायक आहे. हिमालयातील ढग पश्चिम घाटावरील ढगांपेक्षा १.५ पट जास्त प्रदूषित असल्याचे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग अंतर्गत येणारी स्वायत्त संस्था असलेल्या बोस इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात पश्चिम घाट आणि पूर्व हिमालयात पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात पर्जन्यमान नसलेल्या ढगांमध्ये कॅडमियम, तांबे आणि जस्त यासारख्या विषारी धातूंचे लक्षणीय प्रमाण आढळले.
या अभ्यासासाठी, शास्त्रज्ञांनी २०२२ मध्ये पश्चिम घाटातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या छतावर आणि पूर्व हिमालयातील दार्जिलिंग येथील बोस इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये जमा झालेल्या अवक्षेपण नसलेल्या कमी-स्तरीय ढगांमध्ये जड धातूंच्या रचनेचा अभ्यास केला. प्रौढांपेक्षा लहान मुलांना अशा विषारी धातूंचा धोका ३० टक्के जास्त असतो.
पूर्व हिमालयातील प्रदूषित ढगांमध्ये विषारी धातूंचे प्रमाण जास्त असल्याने ते श्वासाद्वारे आत शिरणे हा कर्करोगजन्य नसलेल्या आजारांचा सर्वांत संभाव्य मार्ग आहे, असे ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकेमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात अधोरेखित करण्यात आले आहे.
पूर्व हिमालयातील प्रदूषित ढगांमध्ये श्वासोच्छवास घेणे हे आजारांचे मुख्य मार्ग म्हणून ओळखले जात आहेत. ढगांमध्ये मिसळलेल्या क्रोमियममुळे कर्करोगजन्य धोका वाढला आहे, असेही अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासात प्रदेशातील ढगांमध्ये कॅडमियम, क्रोमियम, तांबे आणि जस्त यांचे वाढलेले प्रमाण डोंगराच्या पायथ्याशी वाहने आणि औद्योगिक उत्सर्जनाशी जोडले गेले आहे.
तुलनेने भारतीय ढंग कमी प्रदूषित
ढग जड धातूंसाठी वाहतूक माध्यम म्हणून काम करतात. ते श्वासोच्छवासाद्वारे, त्वचेच्या संपर्कात येऊन आणि उंचावरील भागात पावसाच्या पाण्याच्या सेवनाद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. चिंताजनक निष्कर्ष असूनही, अभ्यासात असे म्हटले आहे की चीन, पाकिस्तान, इटली आणि अमेरिका यासारख्या देशांच्या तुलनेत भारतीय ढग तुलनेने कमी प्रदूषित आहेत.