तरुण भारत लाईव्ह न्युज : गेल्या काही महिन्यापूर्वीच जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी एका टेबलावर पाच वर्ष झालेल्या कर्मचार्यांच्या बदल्या केल्या होत्या.त्यांची उचलबांगडी करत अन्य विभागात बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र त्या कर्मचार्यांनी पुन्हा मुळ विभागात येण्यासाठी ’लॉबींग’ सुरू केली आहे.
त्यासाठी राजकीय फील्डींग देखील लावल्याने बांधकाम विभागाकडून देखील फाईलीचा प्रवास सुरू झाला आहे. बांधकाम विभागातून शिक्षण विभागात बदली झालेला कर्मचार्यांनीही पुन्हा त्याच विभागात येण्यासाठी फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. त्यासाठी सामान्य प्रशासनाकडे बदलीसाठी प्रयत्न केले जात आहे.सीईओ रजेवर असल्याने त्या काळात बदल्या करण्यासाठी यंत्रणा सक्रीय झाली आहे. एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्या वरिष्ठ सहाय्यक कर्मचार्यांच्या सीईओंनी अन्य विभागात बदल्या केल्या होत्या. तसेच पदस्थापना ज्या विभागात होईल त्याच विभागाकडून वेतन अदा होईल असे देखील आदेश देण्यात आल्याने कर्मचारी रूजू झाले. मात्र नविन विभागात कर्मचार्यांचे मन लागेना अशी स्थिती झाली आहे. राजकीय फिल्डींग लावून व अधिकार्यांशी सलगी साधून पुन्हा त्याच जागेवर येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे देखील फाईलींचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसापासून सीईओ डॉ.पंकज आशिया रजेवर असल्याने या कालावधीत विभाग बदलासाठी काही कर्मचारी सरसावले असल्याचे दिसून येते.