जळगाव : एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कार्यालयात रात्री थांबलेल्या तरुण चालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, 8 रोजी सकाळी उघडकीस आली. सागर रमेश पालवे (25) मूळ रा. मालदाभाडी, ता.जामनेर असे मृताचे नाव आहे.सागर हा गेल्या अनेक वर्षापासून ट्रान्सपोर्ट नगरातील विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कार्यरत होता. गुरुवारी रात्री तो ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात थांबला.
सकाळी कार्यालयात इतर संबंधित कामगार आले असता तो झोपेतून उठत नसल्याचा प्रकार समोर आला. प्रकार कळताच ट्रान्सपोर्टमालकाने धाव घेत इतरांच्या मदतीने सागर याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत घटना जाणून घेतली. रुग्णालयात आलेल्या सागर याच्या आईला मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच तिने आक्रोश केला. रात्री एक वाजेच्या सुमारास सागर याने फोन करून माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, असे त्याची आई आक्रोश करताना सांगत होती.
तरुणाचा नेमका मृत्यू कशाने झाला, हे शवविच्छेदन अहवालातून कारण स्पष्ट होईल. परंतु या घटनेमागील कारणांचा शोध पोलीस तपासातून समोर येईल. गुरूवारी रात्री ट्रान्सपोर्टनगरात उशिरापर्यत कोण कोण थांबले होते. सागर कोणाच्या सहवासात किंवा सागर याच्या सोबत कोण होते? याठिकाणी वाद विवाद झाला का? किंवा सागर हा येथून बाहेर गेला की नेले इत्यादी बाबत तपासातून बघीतल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून कळाले. ट्रान्सपोर्ट नगरात सीसीटीव्ही फुटेजही घेतले जाणार आहे. सागर हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहात तो मोठी जबाबदारी पार पाडत होता. त्याच्या पश्चात आई-वडील तसेच एक विवाहित बहिण असा परिवार आहे.