तळोदा : तळोदा येथून नंदुरबारकडे जात असलेल्या बसच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना चक्क छत्री उघडून प्रवास करावा लागला. तळोदा – नंदुरबार बसमध्ये हा प्रकार घडला आहे.या घटनेमुळे प्रवाशाला मनस्ताप तर इतरांचे मनोरंजन झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.
शुक्रवार, ६ रोजी तळोदा बस स्थानकावरून दुपारच्या सुमारास बस क्र. एमएच २० बीएल ३१२४MH 20 BL 3124 नंदुरबार जाण्यास निघाली. गाडीत बरेच प्रवाशी होते. बाहेर पावसाची रिमझिम सुरु होती. त्यात पुढील पहिल्या सीटवर बसलेल्या प्रवाश्यांला वरून पाणी पडत असल्याची जाणीव झाली. त्याने आपण ओले होऊ नये म्हणून आपल्याजवळ असलेली छत्री उघडून बसावे लागले. त्याला बसायला जागा मिळाली पण वरून पाणी टपकत होते. म्हणून त्याला मनस्ताप झाला. याचवेळी मात्र बसमधील इतर प्रवाशांची मात्र चांगलीच करमणूक होत होती.
शासनाने व महामंडळाच्या दुर्लक्षामुळे ही अवस्था झाल्याचे दिसत आहे. बसचा बाबतीत गळकी, अस्वच्छ व फाटलेल्या व तुटलेल्या सीटा हे अक्कलकुवा आगारातील बसमध्ये नेहमीचेच दृष्य असल्याचे प्रवाशी सांगत होते. सरकार एकीकडे सवलती जाहीर करत असताना बससेवा सुधारणेकडे व चांगली सेवा देण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. महामंडळ प्रवाशी वाढविण्यासाठी प्रयत्न करते. मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करून खरच प्रवाशी वाढतील काय ? तेव्हा संबंधितांनी लक्ष देऊन परिस्थिती सुधारण्याची मागणी प्रवाश्यांमधून होत आहे.