अमळनेर : शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे ३३ लाखांचा संतूर साबण सांगितलेल्या ठिकाणी न पोहचल्याने ट्रक मालक व चालक फरार होऊन कंपनीला चुना लावला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विप्रो कंपनीचा साबणाचा माल तुमकुर (कर्नाटक) या राज्यात पोहचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्ट ह्या कंपनीकडून आरजे ११ जिए ८१३८ ही गाडी चालक कैलाश श्रीराम गुजर (रा.हर्षलो का खेडा पो.भानूनगर ता.जहाजपूर जि.भिलवाडा राजस्थान) व मालक पुष्पेंद्रसिंग सुदानसिंग चहर (रा.मुरलीविहार,देवरौठा शाहगंज,आग्रा उत्तर प्रदेश) यांचा मालकीचा ट्रक भाड्याने घेतला होता. ४ जानेवारी रोजी सदरील वाहनात विप्रो कंपनीतून १० टन १०० किलो वजनाचा संतूर साबण तुमकुर (कर्नाटक) येथे पोहचण्यासाठी मामा ट्रान्सपोर्ट मार्फत ६२ हजार ४४५ रुपये भाडे ठरवून गाडी भरण्यात आली होती. चालक व मालक यास ५० हजार रुपये देऊन गाडी रवाना करण्यात आली होती. ९ जानेवारी रोजी गाडी तुमकुर येथे पोहचणे आवश्यक होते.
मात्र माल त्याठिकाणी पोहचला नाही. चालक आणि मालक दोघांचे फोन बंद येत आहेत. त्यामुळे त्यांनी विश्वासघात करून ट्रक मधील ९८० बॉक्स सुमारे १८ टन १०० किलो वजनाचे सुमारे ३३ लाख २ हजार ६७८ रुपये किमतीचा माल अपहार केल्याचे दिसून येत आहे. अनिलकुमार माईसुख पुनिया लोडिंग मॅनेजर विप्रो यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.