Rajan Salvi : भाजपमध्ये प्रवेश करणार का ? अखेर राजन साळवींनी सोडलं मौन

Rajan Salvi : कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. “मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक आहे आणि बाळासाहेबांचा विचारच माझा आधार आहे,” असे साळवी यांनी स्पष्ट केले.

पराभवाची खंत व्यक्त करताना साळवी म्हणाले, “पराभव झाल्यामुळे जनतेला वेदना झाल्या आहेत. पण मी नाराज नाही. भाजपत जाण्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत.”

भाजपकडून ऑफर आणि अफवांवर साळवींचे उत्तर

पत्रकारांनी भाजपकडून ऑफरबद्दल विचारले असता साळवी म्हणाले, “पिकलेल्या आंब्यावर दगड मारला जातोच. भाजप वा अन्य पक्षांकडून असे प्रयत्न होत असतील, पण मी अजूनही ठाकरेंचा निष्ठावंत आहे.”

शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया

शिंदे गटाचे आमदार आबिटकर यांनी साळवींना पक्षात स्वागत करण्याची भावना व्यक्त केली होती. यावर साळवी म्हणाले, “सर्वच पक्षात नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत होते. मात्र, मी माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी काम करत राहणार आहे.”

एसीबी चौकशी आणि टांगती तलवार

साळवी यांनी सांगितले की, “अँटी करप्शन ब्युरोकडून माझी व कुटुंबाची चौकशी सुरू आहे. आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली असून, निकालानंतर पुढील निर्णय अपेक्षित आहे. सध्या टांगती तलवार कायम आहे.”

ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास

साळवी म्हणाले, “पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली. आत्मचिंतन आणि योग्य सूचना दिल्या. पक्षाचा विचार आणि माझ्या मतदारसंघातील जनतेच्या भावना माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत.”

राजन साळवींच्या या वक्तव्याने त्यांचा भाजप प्रवेश फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास कायम असल्याचा पुनरुच्चार केला.