Jalgaon : महापौरांचा परिसर सुविधांसाठी तुपाशी… बाकी सारे उपाशी

जळगाव : ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ हे ब्रीद असलेल्या व साफ सफाईचा ठेका मक्तेदाराला दिलेल्या जळगावच्या महापौर व विरोधी पक्षनेते यांच्या वॉर्डातील काही भागातच कचरा संकलनासाठी गाडी येत नाही, तसेच रस्ते देखील नसल्याची व्यथा या वॉर्डातील रहिवाशांनी दैनिक तरुण भारत’ शी बोलताना मांडली.

शहरातील समस्यांबाबत ओरड वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘तरूण भारत’ प्रतिनिधीने काही काही भागात भेट देऊन नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.  त्याचा सूर असा की, महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळच सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्रभागातील इतर भागांमध्ये एकही नगरसेवक ढुंकूनही पाहत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या परिसरातील महादेव मंदिर ते अशोक किराणा या रस्त्यावर एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणार्‍या कामगारांची नेहमीच वर्दळअसते. परंतु, या वर्दळीच्या रस्त्यावरील पाईप लाईनची सतत गळती सुरू असते. यातून पादचारी, वाहनधारकांना  मार्ग काढताना कसरत करावी लागते.  तर महादेव मंदिर ते शामा फायरपर्यंत कॉंक्रिट रस्ता असून तेथे रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे.

रिकाम्या जागांमध्ये कचरा
या वॉर्डात ठिकठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा साचला आहे. तसेच येथे कच्च्या गटारी असून त्यांचे सांडपाणीदेखील अशा प्लॉटमध्ये सोडण्यात आले आहे. याप्रकाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील १५ वर्षांपासून रस्त्याची कामे करण्यात आले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. या प्रभागात विविध विकास कामे व सोयीसुविधा होत आहेत ते केवळ महापौर यांच्या घर व त्या परिसरातच करण्यात येत असल्याचा आरोप  नागरिकांनी केला. रेणुका नगर येथे अमृत योजनेची कामे झाल्यानंतर रस्ते खराब झाले होते. या रस्त्यांची दुरुस्ती स्वतः च्या पैशातून केल्याची माहिती नागरिकांनी यावेळी दिली.

कर घेता मग सुविधा का नाही?
महापालिका नागरिकांकडून नियमित कर घेते,  मात्र, कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा देत नाही. साफसफाई देखील वेळेवर होत नाही. घंटा गाडी येत नाही. या प्रभागात चार नगरसेवक आहेत मात्र, एकही इकडे फिरकत नाही. हे नगरसेवक केवळ कामा पुरते मामा असे धोरण अवलंबत आहेत. – सचिन चौधरी, नागरिक

महापलिकेतर्फे कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही. असे असताना आम्ही कर का म्हणून द्यावा. प्रभागात गटार, रस्ते यांची मोठी समस्या आहे. येथे साफसफाई करण्यास कोणी येत नाही. ती नियमित करण्यात यावी.

– शोभा चौधरी, नागरिक

आमच्या भागात रस्ते, गटारी यांची सुविधा नाही. आम्ही वारंवार मागणी करून देखील महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री येण्या-जाण्यास त्रास होतो. स्ट्रीट लाईटची सुविधा करून देण्यात यावी.

–  आरती सूर्यवंशी, नागरिक

रस्ते नसल्याने त्रास सहन करावा लागतो. रस्ते झाले पाहिजेत.  महापलिकेकडून आमची दखल घेतली जात नाही. तसेच कचरा गाडी देखील येत नाही. ती नियमित उपलब्ध करण्यात देण्यात यावी.

–  ज्योती पाटील, नागरिक

वॉर्डात काही भागात कच्च्या गटारी आहेत त्यांचे कॉंक्रीटीकरणं  करावे. , रस्ते खराब झाले असून नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहे. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी पटांगण नसून ते उपलब्ध करून देण्यात यावेत.

– साधना शिंदे, नागरिक

 

जेव्हापासून नगरसेवकानीं  मनपाची निवडणूक लढवून विजय मिळविला आहे, तेव्हापासून त्यांनी वॉर्डात पाय ठेवला नाही.  गटर काढल्यानंतर ती घाण लागलीच उचलली जात नाही. यातून वाद होत असतात. – संगीता घुगे,नागरिक

तुमच्या परिसरातही समस्या आहे ? मग या नंबरला फोटो सहित माहिती पाठवा (९४०४३२६१३२)