---Advertisement---
जळगाव : भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच तलावात तीन दिवसात दोन मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाल्मीक संजय हयाळींगे (वय 27) व नारायण रामदास हयाळींगे (वय 52) असे मृत व्यक्तींचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे 14 नोव्हेंबर रोजी वाल्मीक संजय हयाळींगे (वय 27) यांचा मृतदेह सरकारी दवाखान्यासमोरील तलावात सापडला होता.
वाल्मीक हा त्याचा विनोद नामक मित्रासोबत घरातून निघाला होता. वाल्मीक हरवल्याची नोंद पोलिसात झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच 13 नोव्हेंबर रोजी तलावाशेजारील हॉटेलमध्ये काम करणारे नारायण रामदास हयाळींगे (वय 52) हेही रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले.
अखेर 16 नोव्हेंबर रोजी त्यांचाही मृतदेह त्याच तलावात सापडला. दोन्ही मृत्यू एकाच ठिकाणी झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाल्मीकच्या नातेवाईकांचा आरोप आहे की नारायण यांनी वाल्मीकला शेवटचे एका मित्रासोबत पाहिले होते आणि त्यामुळे त्यांच्यावरही घातपात झाल्याचा संशय आहे.
घातपाताचा आरोप, दीड तास रास्ता रोको
या दोन्ही प्रकरणात घातपाताचा आरोप करत नातेवाईकांनी एरंडोल–भडगाव महामार्गावर दीड तास रास्ता रोको करत मारेकऱ्यांना अटक व शवविच्छेदन इन-कॅमेरा करण्याची मागणी केली. पोलिसांनी तपासाची हमी देत काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.









