---Advertisement---
---Advertisement---
अमळनेर प्रतिनिधी : घरासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रानुसार, अमळनेरच्या शालम नगरात अन्सार शाह हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्यांच्या घरासमोर एक गोडाऊन असून तिथे रात्री उशीरापर्यंत सतत लोखंडी प्लेटा फेकून गोंधळ घातला जातो. याबाबत त्यांनी आधीही तक्रार दाखल केली होती. दरम्यान, 1 एप्रिल रोजी गोडाऊनमधील काहींनी त्यांचा घरासमोर छोटा हत्ती ही गाडी लावली. यावेळी फिर्यादीचा भाऊ शाबीर शाह याने गाडी बाजूला लावण्यास सांगितले.
या कारणावरून संतप्त होऊन गोडाऊनमधील सहा जणांनी शाबीर शाह यांच्यावर लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केला. यामुळे फिर्यादी अन्सार शाह यांनी हस्तक्षेप केला असता त्यांच्यावरही लोखंडी सळईने वार करण्यात आले. त्यानंतर दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जातिवाचक शिवीगाळ करत फिर्यादींचा मोबाईल फोडून नुकसान केले. शिवाय खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्याही दिल्या.
या प्रकरणी अन्सार शाह यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फारुक शेख मजीद शेख, रफिक शेख मजीद शेख, भुऱ्या शेख मजेत शेख, मजीद शेख गुफुर शेख, गफ्फार शेख करीम आणि उस्मान शेख नासीर या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(2), 352, 351(2), 115 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.