---Advertisement---
तळोदा : येथील विद्यानगरी परिसरात उप जिल्हा रुग्णालयाच्या मागे मंगळवारी (ता. १८ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याची दोन वासरे जागीच ठार झाले. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे प्राथमिक तपासात आणि घटनास्थळावरील ठशांवरून स्पष्ट झाले आहे.
संजय गाया पाडवी (रा. विद्यानगरी, तळोदा) यांच्या मालकीची अंदाजे अडीच वर्षे वयाची दोन लाल रंगाची वासरे उप जिल्हा रुग्णालयाच्या मागे अतुल दगडू कर्णकार यांच्या शेत सर्वे नंबर २६६/२ येथील साध्या झोपडीत बांधलेली होती. रात्री २ च्या सुमारास बिबट्याने या वासरांवर हल्ला केला.
एका वासराच्या मानेवर दातांची जखम होती, तर दुसऱ्या वासराच्या मानेकडील मागील भाग पूर्णपणे खाल्लेला आढळला. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी, वनपाल राजवीर व राऊंड स्टॉप यांनी तळोदा येथील पंच मुकुंद जयवंत वळवी आणि गजेंद्र गणपत सिंग पाडवी यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजून ३० मिनिटाला घटनास्थळाचा पंचनामा केला.
पंचनामा करताना आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचे स्पष्ट ठसे आढळले. त्यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे पंचांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. पंचनामा सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी पूर्ण करण्यात आला असून, वन विभागाकडून वन्यजीव हानी भरपाईच्या नियमांनुसार मालक संजय पाडवी यांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची देण्यात आली आहे.








