---Advertisement---
धुळे : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चाळीतील कांदा भरण्याचे काम सुरू होते. या कामावर असलेल्या कामगारांच्या तीन लहान मुली ट्रॅक्टरवर बसून खेळत होत्या. दरम्यान, शेतात उतरतीला लागलेला ट्रॅक्टर अचानक घसरला आणि काही अंतरावर असलेल्या प्रमारे ६० फूट खोल विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत ट्रॅक्टरवर बसलेल्या तीन चिमुकल्यांपैकी एका बालिकेला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने इतर दोन बालिकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दोनपैकी एका बालिकेचा मृतदेह रविवारी रात्री उशिराने, तर दुसऱ्या बालिकेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी हाती लागला. खुशी दाजू ठाकरे (वय ३ वर्ष) व ऋतिका संदीप गायकवाड (वय ३ वर्ष) असे मृत बालिकांचे नाव आहे.
साक्रीच्या गणेशपूर येथील माजी पोलिस पाटील प्रकाश मराठे यांच्या शेजारच्या शेतात रविवारी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चाळीतील कांदा भरण्याचे काम सुरू होते. या कामावर असलेल्या कामगारांच्या तीन लहान मुली ट्रॅक्टरवर बसून खेळत होत्या. दरम्यान, शेतात उतरतीला लागलेला ट्रॅक्टर अचानक घसरला आणि काही अंतरावर असलेल्या प्रमारे ६० फूट खोल व काठ नसलेल्या विहिरीत कोसळला. विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती.
घटना लक्षात येताच आजूबाजूच्या शेतातील शेतमजूर व इतर ग्रामस्थ विहिरीकडे धावले. ग्रामस्थांनी तत्काळ बचावकार्य हाती घेतले. परी संदीप गायकवाड (वय २ वर्ष) या बालिकेला लगलीच सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, बुडालेल्या अन्य दोन मुलींचा शोध लागत नव्हता.
रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या शोधमोहिमेनंतर खुशी दाजू ठाकरे बालिकेचा मृतदेह सापडला. तिसऱ्या बालिकेचा शोध रात्री उशिरापर्यंत लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी, सोमवारीदेखील शोधमोहीम सुरूच होती. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ऋतिका संदीप गायकवाड या बालिकेचाही मृतदेह हाती लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
या दुर्घटनेनंतर तातडीने डीवायएसपी संजय कांबळे, पोलिस निरीक्षक दीपक वळवी, तहसीलदार साहेबराव सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य गोकुळसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली. चिमुकल्या दोन बालिकांच्या हृदयद्रावक मृत्यूमुळे गणेशपूर गावासह परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.









