सुगंधित तंबाखूसह पान मसाल्याचा दोन कोटींचा साठा जप्त, नरडाणा-शिंदखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाची कारवाई

---Advertisement---

 

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा सुमारे एक कोटी ९२ लाख ९९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल नरडाणा व शिंदखेडा येथील पोलिस ठाण्यांच्या संयुक्त पथकाच्या हाती लागला असून, पथकाने दोन ट्रकचालकांना अटक केली आहे. ही कारवाई ७ ऑक्टोबरला मध्यरात्रीनंतर सार्वे शिवारातील गोविंद पेट्रोलपंपाजवळ करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबरला मध्यरात्रीनंतर पावणेदोनच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील सार्वे शिवारात गोविंद पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरीत्या दोन ट्रक उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने छापा टाकून दोन्ही ट्रक (एमपी १३, जीबी २८२२ आणि एमएच २७, डीटी १३४३) ताब्यात घेतले. ट्रकमधून महाराष्ट्रात बंदी असलेला राजनिवास, जाफराणी जर्दा, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आदी सुगंधित तंबाखूचा मोठा साठा मिळून आला. ट्रकचालक अमजद अजीज खान (वय ४३, रा. रतलाम, मध्य प्रदेश) व अशफाक अब्बास खान (वय ४७, रा. राजगड, जि. धार, मध्य प्रदेश) हे हा माल शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने चोरटी वाहतूक करत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दोन्ही ट्रक व त्यातील सुमारे एक कोटी ९२ लाख ९९ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक रवींद्र महाले तपास करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीलेश मोरे, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक एच. एल. गायकवाड, उपनिरीक्षक रवींद्र महाले, पोलिस कर्मचारी विजय आहेर, चालक अजय सोनवणे, हवालदार गणेश पाटील, राईस शेख, ललित पाटील, भरत चव्हाण, नारायण गवळी, योगेश गिते, भुरा पाटील, अनिल सोनवणे, भोई, अर्पण मोरे, सचिन बागूल, चौधरी यांनी केली. संयुक्त कारवाईमुळे महाराष्ट्रात चोरटी सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या टोळ्यांवर धडकी बसली आहे. मात्र, या कारवाईमुळे महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---