Train accident : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर येथे दोन मालगाड्या परस्परांवर आदळल्या. एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला मागून धडक दिली, ज्यामुळे दोन इंजिन आणि एक गार्ड कोच रुळावरून घसरला. या अपघातात एका लोको पायलटसह दोन रेल्वे अधिकारी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात खळबळ उडाली. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघातामुळे रेल्वे ट्रॅक बाधित झाला असून, मदतकार्य करून तो सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. हा अपघात खागा परिसरात डीएफसी रेल्वे ट्रॅकवर झाला आहे.
या दोन मालगाड्यांच्या टकरीमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी जमले. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचून चौकशी करत आहेत. हा अपघात त्यावेळी झाला जेव्हा एकाच ट्रॅकवर पुढे-मागे दोन मालगाड्या आल्या आणि एकमेकींवर धडकल्या. या अपघातामुळे डीएफसीच्या हावडा-दिल्ली अपलाइनवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
हेही वाचा : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला संपवलं; कारण ऐकून पोलीसही हैराण
मागून धडकलेल्या मालगाडीचा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, खागा पोलीस ठाणे हद्दीतील पांभीपूर गावाजवळील न्यू रसूलाबाद आणि न्यू सुजातपूरदरम्यान डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर लाइनवर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. येथे कोळशाने भरलेल्या एका उभ्या असलेल्या मालगाडीला प्रयागराज-कानपूरकडून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने मागून जोरदार धडक दिली. दुसऱ्या मालगाडीमध्ये देखील कोळसा भरलेला होता. या जबरदस्त धडकेमुळे परिसरात मोठा आवाज झाला. या अपघातामुळे दोन इंजिन आणि गार्ड कोच रुळावरून खाली उतरले.
लोको पायलट आणि को-पायलट जखमी
या अपघातामुळे डीएफसीची हावडा-दिल्ली अपलाइन ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जखमी लोको पायलट आणि को-पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पहाटे ५ वाजता घडला. मागून धडकलेली मालगाडी प्रयागराज-कानपूर मार्गावरून येत होती. त्याच ट्रॅकवर कोळशाने भरलेली दुसरी मालगाडी उभी होती आणि त्या दोघांची जोरदार टक्कर झाली. मदतकार्य सुरू असून, रेल्वे ट्रॅक लवकरात लवकर सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.