HMPV Cases In Maharashtra : एचएमपीव्ही (ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरस) विषाणूने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. बंगळुरु, चेन्नई आणि तामिळनाडूनंतर आता महाराष्ट्रात एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळून आले असून, यामुळे राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे.
नागपुरातील दोन रुग्णांची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात सात वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलगी एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३ जानेवारी रोजी त्यांच्या विषाणूची पुष्टी झाली. दोघांनाही ताप आणि खोकल्यासारखी लक्षणं जाणवली होती, मात्र कोणत्याही गंभीर लक्षणांच्या अभावामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारानंतर बरे होत आहेत, अशी माहिती सूत्रांनुसार समोर आली आहे.
शासकीय पातळीवरील तयारी
खाजगी रुग्णालयात झालेल्या चाचण्यांमध्ये हे दोन्ही रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने, त्यांच्या नमुन्यांची पुढील जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी शासकीय लॅबमध्ये होणार आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. खोकला किंवा शिंका येत असल्यास तोंड व नाक रुमालाने झाकणे, साबणाने हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे, भरपूर पाणी पिणे, पौष्टिक आहार घेणे, व संक्रमण टाळण्यासाठी पुरेसे वायुवीजन असलेल्या ठिकाणी राहणे या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
टाळावयाच्या गोष्टी
हस्तांदोलन किंवा टिश्यू रुमालाचा पुनर्वापर करू नका.
आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
डोळे, नाक आणि तोंड वारंवार स्पर्श करू नका.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळा.
राज्यभरातील नागरिकांनी या मार्गदर्शनाचे पालन करून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.