तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव जळगाव : शहरातील जुने जळगाव परिसरात सोमवारी सकाळी ९.३० ते १० वाजेच्या दरम्यान एका लाकडी पार्टिशनच्या घराला आग लागली. या आगीत दोन कुटुबियांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले. आग लागल्याची माहिती मिळताच मनपा दोन बंबासह अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
जुने जळगावातील आंबेडकर नगर परिसरात सोमवारी सकाळी एका लाकडी पार्टिशन असलेल्या घराला आग लागली. प्रथम हिरालाल बाबुलाल बाविस्कर व नंतर शेजारी रहाणारे शरद भगवान सपकाळे (रा. आंबेडकर नगर) यांच्या लाकडी पार्टिशन असलेल्या घराला लागलेल्या आगीमुळे लगतच्या पार्टीशनच्या दुसर्या घरालासुद्धा आग लागली. मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे लक्षात येताच आगीचा प्रकार लक्षात आला. परिसरातील नागरिकांची एकच पळापळ सुरू झाली. नजीकच्या घरातील नागरिकांनी धावपळ करत आगीवर पाणी मारण्यास सुरूवात केली.
अग्निशमन विभागाची धावपळ
आगीच्या प्रकाराची माहिती कळताच मनपा अग्निशमन विभागाच्या पथकाने धाव घेतली. काही वेळातच दोन बंब घटनास्थळी आले. दोन्ही घरातील कुटुंबियांचे संसारोपयोगी साहित्याचे जळून नुकसान झाले. जळत्या घरावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्यात येत होता. मात्र घर लाकडी फळ्यांचे र्असल्यामुळे बरेच नुकसान झाले होते. पोलीस प्रशासनाकडूनही घटनास्थळी धाव घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे घरातील बर्याच वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यांनी केले मदत कार्य
अग्नीशमन विभागाचे शशिकांत बारी, युसूफ अली, नंदू खडके, गिरीश खडके, रवी बोरसे, मोहन भाकरे, पन्नालाल सोनवणे, संतोष पाटील, रोहिदास चौधरी आदी कर्मचार्यासह परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली.
१८ हजार रुपयाची रोकड जाळून खाक जळाले
हिरालाल बाविस्कर यांचा मुलगा अंकुश हा एका कंपनीत कामाला आहे. तो पोलीस भरतीची तयारी करत आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी कामाचे पैसे घरी आणून ठेवले होते. मात्र आगीत त्याची कागदपत्रे व १८ हजाराची रोकडे जळून खाक झाल्याने कुटुंबियांचा आक्रोश या ठिकाणी सुरू होता.