मंडळाधिकार्‍यांच्या नावाने लाच : भुसावळात कोतवालासह दोघे जाळ्यात

भुसावळ : शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्‍यावर शेतकर्‍याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (54, रा.भुसावळ) व खाजगी कर्मचारी हरी देविदास ससाणे (44, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. लाचेच्या कारवाईनंतर तहसीलमधील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

असे आहे नेमके लाच प्रकरण
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील 34 वर्षीय तक्रारदाराने 2022 मध्ये भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथे स्वतःच्या नावाने दोन एकर शेतजमिनीची खरेदी केली आहे. या शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर तक्रादाराचे नाव लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुर्‍हेपानाचे येथे प्रकरण सादर केले. या प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगीता पाटील यांनी काही त्रृटी काढल्या होत्या व भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदार हे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला मंडळाधिकारी यांच्याकडून सातबारा उतार्‍यावर नाव लावून देण्याचे काम करून देतो मात्र त्यासाठी 15 हजारांची लाचेची मागणी केली मात्र तक्रारदाराने रकमेत तडजोड करीत 12 हजार रुपये देण्याचे कबुल केल्यानंतर मंगळवारी जळगाव एसीबीकडे लेखी तक्रार नोंदवण्यात आली.