---Advertisement---
Jalgaon News : अन्य जळगाव जिल्ह्यासह शहरात विविध ठिकाणी घरफोडी करुन सराईत गुन्हेगार मुद्देमालाची विक्री छ. संभाजीनगर तसेच चिखली येथे करत होता. सतत वास्तव्याचे ठिकाण बदलवून संशयित पोलिसांना चकमा देत होता. दोन दिवस एलसीबी व पहूर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीनुसार पथकाला आरोपीला अटक करण्यात यश मिळाले. किशोर तेजराव वायाळ (रा.मेरा बु.ता. चिखली जि. बुलढाणा) असे गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने विविध गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पथकाने पहूर, तोंडापूर घरफोडीतील चोरीचे सुमारे एक लाख ९७ हजार किमतीचे ३५ ग्रॅम सोने हस्तगत केले.
पहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ डिसेंबरला मौजे तोंडपुर तसेच पहुर येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी केली होती. याप्रकरणी तक्रारीनुसार पहुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबी तसेच पहुर पोलीस ठाणे अंतर्गत तपास पथक तयार करण्याचे तसेच गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश केले होते. त्यानुसार तपासाला गती दिली होती.
तांत्रीक एलसीबी पथकाने तपासाचा आधार घेतला असता संशयित किशोर वायाळ याने हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. संशयिताविषयी अधिक माहिती घेतली असता तो सराईत गुन्हेगार असुन एका ठिकाणी वास्तव्यास नसतो, असे पथकाला कळाले. सराईत गुन्हेगाराची अधिक माहिती काढुन पथक त्याच्या मागावर होते. गोपनीय माहिती मिळताच पथकाने तपास चक्र फिरवित त्याला ताब्यात घेतले. त्याने पहुर येथील गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली. त्याप्रमाणे ३५ ग्रॅम सोने त्याच्याकडून जप्त केले.
याठिकाणी घरफोडी
यापूर्वी या गुन्हेगाराने जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, बुलढाणा अशा विविध ठिकाणी गुन्हे केले आहेत. जळगाव व धुळे जिल्ह्यात आणखी घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. या कारवाईतून पहुर पोलीस ठाण्यातील दोन, जामनेर, शिंदखेडा (जि.धुळे) येथील दोन असे एकुण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या सुचनेनुसार एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पहुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रमोद कठोरे, उपनिरीक्षक शेखर डोमाळे तसेच एलसीबीच्या पथकाने केली.









