Jalgaon Crime News : गांजाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त

जळगाव : चोपडा तालुक्यातील नागलवाडी रोडवरील वराड फाट्याजवळून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना चोपडा शहर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 1 लाख 45 हजार रुपये किमतीचा 14 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

चोपडा शहरातील नागलवाडी रोडवरील वराड फाट्याजवळ गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यानुसार चोपडा शहर पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

हेही वाचा : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!

आरोपींचे नावं रोहित संजय शेळके (२५) आणि तुळशीराम कचरू आव्हाने (२०), दोघे परभणी जिल्ह्यातील परळीरोड, भीम नगर येथील रहिवासी आहेत.

आरोपींवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांचे नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा : धक्कादायक! महिलेने पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या अन्… नेमकं काय झालं?

महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये धाडसी चोरी

जळगाव : पुणे येथून बडनेरा जाणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी तब्बल १२ लाख ५ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. ही घटना ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये पाचोरा स्टेशननजीक घडली. या प्रकरणी रेल्वे पोलीस तसेच लोहमार्ग पोलीस या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

संध्या चंद्रकांत राठी (वय ६९, रा. देवरणकरनगर, अमरावती) या पुणे येथील नातेवाइकांकडे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. पुणे येथून अमरावतीला परतण्यासाठी त्या महाराष्ट्र एक्सप्रेसमधून प्रवास करत होत्या. रात्री झोपलेल्या अवस्थेत असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या पर्समधील सोन्याच्या दोन चैन, डायमंड मंगळसूत्र, कानातील झुमके, टॉप्स आणि १० हजार रुपये रोख असा एकूण १२.०५ लाखांचा ऐवज लंपास केला.

सकाळी सात वाजेच्या सुमारास पाचोरा स्टेशनजवळ पोहोचल्यावर महिलेच्या लक्षात आले की, त्यांची पर्स उघडी असून तिच्यातील मौल्यवान वस्तू गायब आहेत. त्यांनी तातडीने बोगीत शोध घेतला, मात्र कुठेही चोरीला गेलेले दागिने सापडले नाहीत.

संध्या राठी यांनी तत्काळ रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर चोरीची माहिती दिली. जळगाव स्टेशनवर गाडी पोहोचल्यानंतर लोहमार्ग पोलीस हवालदार सचिन भावसार यांनी महिलेची तक्रार नोंदवून हा गुन्हा पाचोरा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला.

सीसीटीव्ही तपासणीला गती

या घटनेनंतर महाराष्ट्र एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे पोलीस तसेच लोहमार्ग पोलीस या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.