भुसावळ : शहरातील यावल रोडलगत असलेल्या चंद्रनगर येथील दुमजली रो हाऊस अचानक कोसळल्याची दुर्घटना रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुरमास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
शहरात काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यावल रोडलगत असलेल्या साई चंद्रनगर येथील दुमजली इमारत कोसळण्याआधी या इमारतीला तडे पडले. हि बाब लक्षात आल्याने घरातील व्यक्ती घराबाहेर मैदानावर आल्याने कोणासही इजा झाली नाही. घरातील नागरिक बाहेर आल्यानंतर १५ मिनिटांच्या फरकाने ही इमारत कोसळली. या घटनेचे नागरिकांनी त्याचा व्हिडीओ चित्रित केला व लगेचच व्हायरल झाला. यामुळे या वसाहतीतील कंपाउंड वॉललासुद्धा मोठे तडे गेलेले आहेत. संभाव्य धोका बघता येथील धोकाग्रस्त इमारतीमधील नागरिकांना येथून घर खाली करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सातारे शिवार, ता. भुसावळ येथे या तिन्ही इमारतींचा सततच्या पावसामुळे जमिनीचा भराव वाहून गेल्याने या नवीन घरांची पडझड झाल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. प्रति घराचे अंदाजे १५ ते २० लाखांचे तसेच घरातील मौल्यवान वस्तूंचे सुमारे ५ ते ६ लाखांचे प्रत्येकी नुकसान झाले आहे. चंद्रकला रमेश दांडेकर व मनोज रमेश दांडेकर तसेच विद्या चंद्रकांत चौधरी व विराज चंद्रकांत चौधरी यांचे घर घरातील वस्तूंचेही नुकसान झाले.
तसेच रुख्मिणी प्रवीण नरवाडे यांनी खरेदी केलेले घराचाही समावेश आहे. परंतु अधिकार अभिलेखात नाव दाखल झालेले नाही. पडझड झालेल्या घराच्या दक्षिण बाजूस असलेल्या सात रहिवाशांना इतर ठिकाणी राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. तसेच पूर्व बाजूस असलेल्या पदमालय अपार्टमेंटमध्ये २४ फ्लॅट्सपैकी १७ फ्लॅट्समध्ये रहिवासी आहेत. इतर ५ रिकामे आहेत. या अपार्टमेंटच्या उत्तर बाजूस असलेल्या भिंतीस तडे पडून इमारत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील रहिवाशांची पालिकेकडून लोणारी मंगल कार्यालयात राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, आपत्ती व्यवस्थान व बचाव पथक अग्निशमन दलाचे कर्मचारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, तलाठी नितीन केले यांची उपस्थिती होती.