वर्क ऑर्डरसाठी लाच घेणे भोवलं ; ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ/पारोळा : ६० लाख रुपये खर्चाच्या विकासकाम ांची वर्कऑर्डर काढून देण्यासाठी पारोळा गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने दोन टक्के व स्वतः साठी एक टक्के याप्रमाणे एक लाख ८० हजारांची लाच मागून तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पारोळा पंचायत समितीतील ग्रामविस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (५८) व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (२८) यांना पारोळा पंचायत समितीतील कार्यालयातच शुक्रवारी दुपारी एक वाजता जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली.

या कारवाईने पारोळा पंचायत समितीतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. या कारवाईनंतर पारोळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्यादेखील अडचणी वाढल्या असून, त्यांनाही आता एसीबीच्या चौकशीला साम ोरे जावे लागणार आहे.

असे आहे लाच प्रकरण
धुळपिंप्री, ता. पारोळा येथील २५ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते सरपंच यांचे चिरंजीव आहेत व गावातील ग्रामपंचायतीत महात्मा रोजगार हमी योजनेंतर्गत काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉकची एकूण प्रत्येकी १५ लाखांप्रमाणे चार कामे मंजूर झाली आहे. या कामाची वर्कऑर्डर काढण्यासाठी आरोपी कल्पेश बेलदार बीडीओ यांच्या नावाने व स्वतःसाठी एक टक्के प्रमाणे एक लाख ८० हजार रुपयांची लाच १०, १२, १६ व १९ सप्टेंबर रोजी मागितली. तक्रारदाराने १० सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर वेळोवेळी लाच पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपी सुनील पाटील यांनी लाचेला प्रोत्साहन दिले व शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पंचायत समि तीत आरोपी कल्पेश बेलदार याने तडजोडीअंती एक लाखांची लाच बीडीओ यांच्यासाठी मागून ती स्वीकारली.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे, हवालदार सुनील वानखेडे, नाईक किशोर महाजन, नाईक बाळू मराठे आदींच्या पथकाने यशस्वी केला.