मुंबईः मुंबईतल्या वरळीमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १५ मजली इमारतीची लिफ्ट कोसळून काचा साफ करणाऱ्या दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, ४ जानेवारी रोजी मुंबईतल्या विक्रोळी भागामध्ये अशीच घटना घडली होती. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता.
वरळीतील अविघ्न टॉवरचं १५ मजल्यांचं बांधकाम पूर्ण झालं असून लिफ्ट बसवण्याचं काम सुरु होतं. या इमारतीच्या काच पुसण्याचं काम काही कामगार लिफ्ट ट्रॉलीच्या सहाय्याने करीत होते. तेव्हा अचानक ही ट्रॉली खाली कोसळली.
या घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या खिडक्यांच्या काच पुसण्याचं काम हे कामगार करीत होते. लिफ्ट कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.