तरुण भारत लाईव्ह न्यूज : कार आणि दुचाकी यांच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना रामदेववाडी जवळील हनुमान मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. रफिक हुसेन मेवाती (वय-23) आणि अरबाज जहांगीर मेवाती (वय 20) दोन्ही रा. राणीचे बांबरुड ता.पाचोरा असे मृत झालेल्या दोन्ही तरुणांचे नाव आहे.
रफिक हा तरुण पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे वास्तव्याला होता. जळगावातील मास्टर कॉलनी पेरू विक्रीकरून आपला व्यवसाय करीत होता. 5 डिसेंबर रोजी दिवसभर पेरूची विक्री करून सायंकाळी 6.30 वाजता दुचाकी (एमएच 19 सीएच 4359) रफिक मेवाती हा त्याचा मित्र अरबाज याच्यासोबत राणीचे बांबरुड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिराजवळून दुचाकीने जात असताना पाचोर्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणार्या कारने (एमएच 19 बीजे 2175) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रफिक मेवाती आणि अरबाज मेवाती हे दोघे युवक जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. अपघात घडल्यानंतर नातेवाईकांसह मित्रपरिवाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी केली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.