जळगाव : दुचाकी अपघातात वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यात घडली. याबाबत विविध पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
जळगाव एमआयडीसी कंपनीत काम आटोपून घरी निघालेल्या तरूणाच्या दुचाकीसमोर कुत्रा आडवे आल्याने दुचाकी दुभाजकावर आदळल्याने कुसुंबा येथील दुचाकीस्वाराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी ७ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कुसुंबा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे. गौरव उर्फ गणेश घनश्याम सोनार (२६) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील महेंद्रा शोरूम येथे जात असताना स्पीडब्रेकरवरून दुचाकी उधळून डिव्हायडरला धडक लागल्याने वाहनावरील तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी ६ जुलै रोजी रात्री ११ वाजता घडली. तर त्याचा मित्र आकाश पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. महेश रामभाऊ माळी ( २५, रा. जाकीर हुसेन कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.