तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील सराफा व्यावसायिकाला धारदार शस्त्राने मारहाण करून लुटल्याची घटना दि.30 नोव्हेंबरला नरवेल फाट्याजवळ घडली होती. व्यावसायिकाकडून मोटार सायकलवर आलेल्या तीन चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १७ लाख ८० हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने नवीन टोळी पकडली असून या घटने व्यतिरीक्त आणखी चार दरोड्यांची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांच्याकडून सुमारे 12 लाख 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असे ही ते म्हणाले. मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे निलेश वसंत सोनार (वय ३२, रा. नरवेल ता. मुक्ताईनगर) यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. ते दररोज दुकानातील दागिने आणि पैसे घरी घेऊन जात असतात. दि.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन घरी आपल्या दुचाकीवरून परत जात होते.
नरवेल फाट्याजवळ एका पल्सरवर चेह-यावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने व दगडाने मारहान करुन निलेश सोनार यांच्याकडील ९ लाख रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये किंमतीचे २ किलोचे चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपये रोख असा एकूण १० लाख ६० हजाराचा ऐवज बळजबरीने लुटून नेले. हा झटापटीत चोरट्यांनी निलेश सोनार यांच्या हाताला आणि पायाला चाकूसारख्या शस्त्राने वार केल्यामुळे ते जखमी झाले होते.
घटना घडल्यानंतर लागलीच एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह रवाना झाले होते. तीन दिवस सलग मागोवा घेत ५ पथकांनी वेगवेगळ्या मार्गाने गुन्ह्याची एक एक कडी जोडली. विशेषतः सर्व पथके रात्रीच्या वेळी कार्य करीत होते. गुप्त माहिती आणि काही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एक टोळीचा शोध लावला. सुप्रीम कॉलनीतील तिघांना घरून अटक करण्यात आली तर एक रायपूर कंडारी ता.जळगाव आणि एकाला उचंदा येथून अटक करण्यात आली.
ताब्यातील संशयित सुनिल मिश्रीलाल जाधव, प्रकाश वसंत चव्हाण, आकाश दिलीप पवार यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपण गेल्या नऊ महिन्यांमध्ये पळासखेडा ते बोदवड, वराड ते विटनेर रोडवर, लासगाव ते बांबरुड रोडवर, वराड ते रोडवर मोटार सायकलस्वार यांना अडवून त्यांचे कडून रोख रुपये व मोबाईल हिसकाविल्याची कबुली दिली.
एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, उपनिरीक्षक गणेश चौभे, सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, अनिल जाधव, युनुस शेख, हवालदार विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश गेंडे, सुनिल दामोदरे, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, अशरफ शेख, संदिप पाटील, दिपक पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, विजय पाटील, संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, रविंद्र पाटील, परेश महाजन, पोकॉ विनोद पाटील, ईश्वर पाटील, दिपक शिंदे, उमेश गोसावी, रमेश जाधव, राजेंद्र पवार, भारत पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, मुरलीधर बारी, प्रमोद ठाकुर तसेच मुक्ताईनगर पो.स्टे.चे उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे, पोहेकॉ गणेश मनोरे, पोना मोतीलाल बोरसे, धर्मेंद्र ठाकूर, राहुल महाजन, प्रशांत चौधरी, सतिष भारुडे, लतिफ तडवी अशांनी गुन्हा उघड केला आहे.