उदय सामंतांच मोठं विधान, म्हणाले ‘आज ठाकरे गटाला दाखवणार ट्रेलर’

#image_title

दावोस दौरा गुंतवणुकीपेक्षा उद्धव ठाकरे गट फोडण्याच्या चर्चेने अधिक गाजला. ठाकरे गटाने उदय सामंत हे शिंदे गटात बंड करणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे आणि आपल्यात भांडणं लावण्याचा हा पोरखेळ असल्याचे म्हटले होते. तर उद्धव सेनेलाच भगदाड पडणार असल्याच त्यांनी सांगितलं. परदेशातून परतताच त्यांनी ठाकरे गटाला मोठा अल्टिमेटम दिला. आज रत्नागिरीतून ठाकरे गटाला ट्रेलर दाखवणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.

चार आमदार, तीन खासदार शिंदे गटात

विधानसभेत मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात येणार असल्याचा दावा सामंत यांनी केला. ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. रत्नागिरीत त्यांना पहिला ट्रेलर दाखवणार असल्याच ते म्हणाले. केवळ ठाकरे गातच नाही तर काँग्रेसला देखील झटका देणार असल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेसला खिंडार पडणार असल्याचे ते म्हणाले. आज रत्नागिरीत पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी सुद्धा सुरू झाली आहे.

रत्नागिरीत जय्यत तयारी

उद्योग मंत्री उदय सामंत आज रत्नागिरीतून पहिला ट्रेलर दाखवणार आहेत. ठाकरे गटाला खिंडार पडणार आहेत. जवळपास ४५० कार्यकर्ते ठाकरे गटाला रामराम करणार आहेत. तालुकाप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच अशांचा आज दुपारी १२ वाजता पक्षप्रवेश होणार आहे.

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपविभाग प्रमुख दत्ता तांबे, विभाग प्रमुख अप्पा घाणेकर, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर आज शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.

दरम्यान जे चार आमदार आणि तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत, त्यांची नावे त्यांनी उघड केली नाहीत. तर काँग्रेसमधून कोण येणार याची सुद्धा माहिती समोर आलेली नाही. कालच्या उद्धव सेना आणि शिंदे सेनेच्या मेळाव्याला काही आमदारांनी, खासदारांनी दांडी मारल्यानंतर चर्चेला पेव फुटले एवढे मात्र नक्की.