उद्धव ठाकरे हे रिकामे काडतूस !

प्रासंगिक

– मोरेश्वर बडगे

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून उद्धव ठाकरे बावचळले आहेत. प्रचंड वैफल्य आहे. हातून सत्ता गेली, पक्ष गेला, धनुष्यबाण गेला, मुख्यमंत्रिपदही गेले. पुढे ते आणि त्यांचे कुटुंब एवढेच राहतील; ते दिवस दूर नाहीत. माझ्याकडे देण्यासाठी काही उरले नाही, असे ते वारंवार बोलतात. तसेही उद्धव दानशूर म्हणून प्रसिद्ध नाहीत त्यांनी घेण्याचेच काम केले, अशी त्यांच्याच सहका-यांची तक्रार आहे. रिकामपण, रिकामे हात ही गोष्ट कुठल्याही राजकारण्याला मोठी शिक्षा असते. उद्धव आज ती भोगत आहेत. रिकामपणातून आलेले वैफल्य त्यांच्या बोलण्यात उमटते आहे. गेली नऊ महिने त्यांचा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उद्धव यांच्या नाकाखालून शिंदेंनी ४० आमदार नेले, सत्ता नेली. उद्धव यांचा जळफळाट समजू शकतो.सकाळच्या चहाच्या कपातही त्यांना एकनाथ शिंदे दिसत असतील. याला बापसुद्धा दुस-याचा लागतो, धनुष्यबाण चोरला तरी राम माझ्यासोबत आहे, अशी मुक्ताफळे ते उधळत असतात.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाटेला ते फारसे गेले नव्हते. बजेट अधिवेशनात विधानभवनात दोघे समोरासमोर आले तेव्हा तर दोघांनी छानपैकी ‘हाय-हॅलो’ केले होते. मात्र, ठाण्यातील त्यांच्या रोशनी शिंदे नावाच्या एका महिला पदाधिका-याला शिंदे गटाच्या पदाधिकारी महिलांकडून धक्काबुक्की झाल्याचे निमित्त झाले आणि उद्धव सरकले. गर्भवती रोशनीला पोटात लाथा मारल्या, असा कांगावा केला गेला. सहसा घराच्या बाहेर न पडणारे उद्धव सहकुटुंब रोशनीला भेटायला गेले. पुढे मीडियाशी बोलताना उद्धव जास्तीचे बोलून गेले. संजय राऊत खालच्या पातळीवर बोलतात. उद्धव यांनी चक्क राऊतांनाही मागे टाकले. शिव्या द्यायच्या शर्यतीत या दोघांपैकी कोण जिंकतो, ते आता पाहायचे. देवेंद्र फडणवीस फडतूस गृहमंत्री आहेत, असे ठाकरे बोलले. फडणवीस यांनी लगेच त्यांना उत्तर दिले. ‘आपण फडतूस नव्हे, काडतूस आहोत, घुसून मारत असतो’, असे फडणवीस म्हणाले. या वादावादीने राजकारण तापले आहे.

प्रश्न हा आहे की, उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना एवढे का अंगावर घेतले? फडणवीस यांच्याशी थेट भिडावे असा हा विषय नव्हताच. जसे सांगितले जाते तशी रोशनीला मारहाण झालीच नाही. मोदी, शिंदे यांच्या विरोधात पोस्ट का टाकता? त्यावरून बाचाबाची, धक्काबुक्की झाली असेल. तक्रार करण्यासाठी रोशनी शिंदे पायी चालत पोलिस ठाण्यात गेल्या. तेथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले गेले. डॉक्टरांचा अहवाल नॉर्मल आहे. मग ठाकरेंनी या घटनेचे एवढे भांडवल का करावे? फडतूस गृहमंत्री म्हणेपर्यंत ठाकरेंचा तोल का गेला? याला फडतूस म्हणता तर तुमचा गृहमंत्री काय दिवे लावत होता? उद्धव मुख्यमंत्री होते तेव्हा पोलिस खात्यात काय खेळ झाले हे आता लपून राहिलेले नाही. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली कार पोलिसांनीच आणून उभी केली. मनसुख हिरेंच्या खुनाचा कट पोलिस ऑफिसमध्येच शिजला. सचिन वाझे, परमबीर सिंग यांनी नंगानाच चालवला तेव्हा उद्धव यांचाच गृहमंत्री होता. देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी नेते होते. फडणवीस यांनी वाझे याच्याबद्दल सावध केले तेव्हा तो ओसामा बिन लादेन आहे का? असे हेच मुख्यमंत्री उद्धव म्हणाले होते. s महिलांना मारहाण होतेय म्हणून आज उद्धव यांना संताप येत असेल तर मग कंगना राणावत, नवनीत राणा, केतकी चितळे यांनी असा कुठला गुन्हा केला होता?

कंगनाच्या घरावर बुलडोझर चालवला. राणा दाम्पत्य तर फक्त तुमच्या घरापुढे हनुमान चालीसा वाचू पाहत होते. त्यात तुम्हाला देशद्रोह दिसला. दुस-या कोणाची पोस्ट शेअर केली एवढ्याच चुकीसाठी केतकीला तुरुंगात डांबले गेले. विरोधात पोस्ट टाकली म्हणून नौदलाच्या एका वृद्ध अधिका-याचा तुमच्या कार्यकत्र्यांनी डोळा फोडला. हे सारे घडले तेव्हा उद्धव घरात बसून होते. आज मात्र एका न झालेल्या मारहाणीने त्यांचे रक्त खवळले. मग पत्रकारांनी उलटसुलट प्रश्न विचारले तेव्हा चिडचिड का करता?शेवटी उद्धव म्हणजे काय? हे रिकामे काडतूस आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईच्या जोरावर आणि भाजपाच्या संगतीने आतापर्यंत निभले. स्वतःचे कर्तृत्व नाही. युतीत राहिले असते तर आज मजेत असते. युती सरकारमध्ये असताना उद्धव यांनी भाजपाला ताकद दिली नाही. आमचे मंत्री राजीनामे खिशात ठेवून फिरतात, अशी मस्तीची भाषा होती. २०१९ मध्ये मुख्यमंत्री होण्याचा किडा चावला आणि उद्धव चक्क शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. मात्र, अडीच वर्षांत उठावे लागले. फडणवीस यांनी पूर्ण पाच वर्षे सरकार चालवून दाखवले. वसंतराव नाईक यांच्यानंतर पूर्ण टर्म राहिलेले फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. तुम्ही नावापुरते मुख्यमंत्री होते. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धवना ती जागा भरून घेता आली नाही.

कुठलाही चतुर मुख्यमंत्री गृहखाते स्वत:कडे ठेवतो. तुम्ही ते खाते राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. मुख्यमंत्री या नात्याने तुम्हाला कसलीही चमक दाखवता आली नाही. उलट तुमच्या आमदारांनी बंडखोरी केली तेव्हा राजीनामा देऊन तुम्ही स्वत:चे राजकीय दिवाळे काढले. आता कुठल्या तोंडाने पुन्हा सत्ता मागता? स्वत:मध्ये धमक नाही आणि एक अकेला देवेंद्र सर्वांना पुरून उरतोय तर उद्धव त्यांना फडतूस म्हणत आहेत. तुलनाच होऊ शकत नाही. महाआघाडीच्या सभांना गर्दी जमते म्हणून उद्धव यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. सभांची गर्दी मत देतेच असे नाही. दोन्ही काँग्रेसला एकत्र आणून आपण मोठा तीर मारला या भ्रमात उद्धव आहेत. मात्र, ही महाआघाडी म्हणजे महाधोका आहे. उद्धव यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी शरद पवार धावताहेत अशातला भाग नाही.त्यांना सुप्रिया सुळे यांना म्हणजे मुलीला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. अजितदादा पवार हे कसे होऊ देतील? तिकडे नाना पटोले यांच्याही महत्त्वाकांक्षा उसळी मारत आहेत. ‘एक अनार और सौ बिमार’ अशी परिस्थिती आहे. तुम्ही लिहून ठेवा; २०२४ च्या निवडणुकीआधी महाआघाडीची महाबिघाडी होणार! वेगवेगळ्या डोक्यांची माणसे कशी एकत्र राहू शकतील? ठाकरेंना सावरकर पाहिजे. काँग्रेसला सावरकर नावाची अ‍ॅलर्जी आहे. भाजपाने सुरू केलेल्या सावरकर गौरव यात्रेने महाआघाडीला उघडे पाडले आहे.नितीन गडकरी यांनी तर राहुल गांधींचे आभार मानले.

सावरकर आम्हाला नव्याने घरोघरी नेण्याची संधी दिली, असे गडकरी म्हणाले. खरी गोची आहे ती उद्धव ठाकरे यांची. ठाकरे या नावाची जादू उद्धव यांनी संपवली आहे. मुख्यमंत्री होण्याच्या लोभात उद्धव आपले खरेखुरे मैत्र गमावून बसले आहेत. तुम्ही लिहून ठेवा, २०२४ मध्ये शरद पवार, राहुल गांधीच काय, नाना पटोलेही उद्धव यांच्या मदतीला येणार नाहीत. जागा वाटपात तिघांच्या मारामा-या होतील इकडे भाजपाशी दोस्तीचे दोर उद्धव यांनी मागेच कापले. स्वत:चीच कबर खणली. आता फडणवीस यांना छेडले. देवेंद्र फडणवीस घाई करीत नाहीत. ‘थंडा कर के खाव’ असा त्यांचा फंडा आहे. फडणवीस स्वत:हून कोणाला हात लावत नाहीत. समोरच्याला चुका करण्याची संधी देतात. १०० चुका झाल्यानंतर श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र चालवले. उद्धव यांनी ती पाळी आणली आहे. ऑपरेशन सुरू झाले आहे. मुंबई महापालिकेच्या कामांची चौकशी सुरू झाली आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्र फडणवीस यांच्या हाती सुदर्शन चक्र पाहील! शिवसैनिकही आता हुशार झाले आहेत. काय मिळाले आणि काय मिळवायचे याचा हिशोब करू लागले आहेत. तुम्ही पाहाल, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चमत्कारिक निकाल येतील.