‘त्या’ घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर ओढले ताशेरे

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आज गुरुवारी प्रारंभ झाला आहे. अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित लिफ़्ट प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या एकत्रित प्रवासावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत  ‘ती लिफ्ट ६ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत आपले मत व्यक्त केलं.  देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘त्यांची लिफ्ट ६ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी लिफ्ट शिफ्ट केली. आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये गेलो. ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेले’.

एनडीए सरकारबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  काही लोक बोलत आहेत. काही लोक आनंद व्यक्त करत आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळे पेढे वाटत आहेत. भाजपने २४० जागा जिंकल्या. त्याच्या सर्वांच्या मिळून तितक्या जागा आल्या नाही. काही लोक छाती फुगवून येणारे पाहतोय. देशात खोटे नरेटिव्ह पसरवलं. संविधान बदलणार साऱख्या खोट्या बातम्या पसरवूनही मोदी सत्तास्थानी पोहोचले.