स्थगिती असतानाही उद्धव ठाकरेंच्या हस्ते जळगावात होणार महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत शासनाने स्थगिती दिल्यानंतरही आता पेच कायम आहे. परंतु उद्या रविवारी (ता. १०) पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होईल, अशी ठाम भूमिका शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

दरम्यान शहराचे आ. सुरेश भोळे यांनीही सामजस्यांची भुमिका घेत अनावरणास विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकूण राजकीय स्थितीतील नाराजीची धार काही प्रमाणात बोथट झालेली असली तरी प्रशासन आणि कायद्याची धार मात्र तिव्र आहे. शासनाने या कार्यक्रमास स्थगीती दिलेली असतांनाही हे कार्यक्रम होत आहे.

आज  सकाळी हॉटेल के. पी. प्राईड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महापालिकेतील गटनेते नितीन लढ्ढा, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते.

काय म्हणाले संजय सावंत

संजय सावंत म्हणाले, “आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बैठक घेतली, त्यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांबाबत महापौर, उपमहापौर यांच्या माध्यमातून आयुक्तांनी शासनाशी केलेला पत्रव्यवहार, तसेच आयुक्तांनी राजशिष्टाचाराबाबत पुणे-मुंबई येथे पत्रव्यवहार करून घेतलेली माहिती, तसेच त्यानंतर तयार झालेली कोनशिला याची संपूर्ण माहिती दिली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या आवश्‍यक असलेल्या सर्व परवानग्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या पुतळ्यांच्या अनावरणाला स्थगिती देण्याची शासनाची कोणतीही गरज नव्हती.

महापालिकेने पुतळा अनावरणासाठी सर्व परवानग्या जाहीर केल्या आहेत. त्यानंतरही जर शासन स्थगिती देत असेल, तर या प्रकरणाला राजकीय वळण दिले जात आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाच बोलवायचे असेल, तर राज्यात जे काही पुतळे बसविले जाणार आहेत, त्यांचे अनावरण त्यांनीच करावे, सर्व कार्यक्रमाची तयारी झालेली असताना नगरसेवक विरोध करतात, शासनाला पत्र जाते, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तारीख व वेळ घेण्यासाठी कार्यक्रम स्थगित करण्याबाबत पत्र येते, त्यामुळे यातही मोठे राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे