अंबादास दानवे यांच्या निलंबनावार उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्याने सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातून ५ दिवसांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंच्या कृत्याचं समर्थन केलेलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यावर त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. दुसरी बाजू मांडल्यानंतर निर्णय अपेक्षित असतं. निलंबनाचा निर्णय हा सभापतींचा असतो. पण त्यासाठी एकतर्फी निर्णय घेणं लोकशाहीला घातक आहे. अंबादास दानवेंना बाजू मांडण्याची वेळ द्यायला हवी होती. पण विरोधी पक्ष नेत्याला निलंबित करणं हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. दानवेंच्या वक्तव्यामुळे मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माता-बहिणींची माफी मागतो,” असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही!

“काल राहुलजींनी सांगितलं की, फक्त भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. त्यांनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही. ते काहीही चुकीचं बोललेले नाहीत. पण अर्धवट माहितीवरुन राहुल गांधींच्या निषेधाच्या ठराव आणण्यात येत होता,” असे म्हणत त्यांनी राहुल गांधींचीही पाठराखण केली आहे.