मुंबई: महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या दिवशी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. यावर निवडणूक आयोगाने भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर कारवाई हाती घेतली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यानुसार राज्य निवडणूक आयोग उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद तपासणार आहे. यात तपासणीत काही वादग्रस्त आढळल्यास निवडणूक आयोग यावर कारवाई करेल.
राज्यात २० मे रोजी मुबईच्या सहा व उर्वरित महाराष्ट्रातील ७ अशा एकूण १३ लोकसभा मतदार संघात मतदान झाले. यात मुबईतील सहा लोकसभा मतदार संघात निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे मतदान प्रक्रिया संथ गतीच्या पार पडत असल्याचा आरोप केला होता. याच कारणाने काही मतदार घरी निघून गेले असे त्यांनी म्हटले होते. यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. जेथे महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे तेथे जाणूनबुजून मतदानाला उशीर केला जातोय, हे भाजपचे कारस्थान असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
मतदान प्रक्रिया सुरू असताना उद्धव ठाकरे कशी काय पत्रकार परिषद घेऊ शकतात ? असा प्रश्न मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केला. यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे यांनी आदर्श आचरसंहिताचा भंग केला असल्याची तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाने त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली होती.