जळगाव । शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी देवकर यांच्यावर जिल्हा बँक, मजूर फेडरेशन आणि अटलांटा प्रकरणांतील घोटाळ्यांचा आरोप करत त्यांचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, “गुलाबराव देवकर हे आपल्यावरील आरोपांमधून बचाव करण्यासाठी विविध पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही त्यांना काही सोडणार नाही आणि त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणारच.”
देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी विचारले की, “देवकर यांना इतक्या लवकर पक्ष बदलण्याची घाई का आहे? त्यांना आठ दिवसांत पळावे लागत आहे, कारण त्यांनी जिल्हा बँकेचा घोटाळा आणि मजूर फेडरेशनचा दहा कोटींचा गैरव्यवहार केला आहे.”
अटलांटा घोटाळा, घरकुल घोटाळ्यात झालेली शिक्षा. आता अजून त्यांची ही सर्व प्रकरणे बाहेर येतील. या सर्वांमध्ये त्यांचे हात बरबटलेले आहे.
त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, ही टीका आगामी राजकीय वादाला तोंड फोडण्याची शक्यता व्यक्त करणारी आहे, ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, आता गुलाबराव देवकर यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागणार आहे.