जळगाव : शहरात, बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत किंवा रेल्वे स्थानकानजीक दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारून तसेच पायी किंवा चालत्या वाहनावर बोलणार्याच्या हातातून मोबाईल हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु समोरच्या व्यक्तीवर लक्ष ठेवून त्याला गाफिल ठेवून ‘काका, एक कॉल लावून द्या ना,’ असे आर्जव करीत हातोहात मोबाईल लांबविला. मोबाईल चोरट्यांनी आता हा नवीनच फंडा आचरणात आणला आहे.
मध्य रेल्वेच्या जळगाव स्थानकावर चाळीसगावकडे जाणार्या एक्सप्रेसची वाट पहात एक मध्यमवयीन गृहस्थ मोबाईल चाळत उभे होते. तेवढ्यात ‘काका, एक कॉल लावून द्या ना!’ अशा विनवणीच्या सुरात एका जणाने विनंती केली. काकाने कॉल लावण्यासाठी मोबाईल देताच, काही कळण्याच्या आत मध्यमवयीन गृहस्थाच्या हातातील महागडा मोबाईल एका भामट्याने हातोहात लांबवला. त्या गृहस्थाने हातातली बॅग सावरत चोर….चोर करीत मोबाईल चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत मदतीसाठी हाका मारल्या. दोन-तीन जणांनी या भामट्याला पकडण्याचा प्रयत्नदेखील केला. परंतु, या डोळ्याचे पापणी लवते न लवते तोच हा भामटा सायंकाळच्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी, अॅाटोरिक्षांसह व स्थानकात येणार्या व बाहेर जाणार्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत पसार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यासंदर्भात तक्रार करूनही काही उपयोग नाही.
जळगाव शहरात मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेतसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. परंंतु बहुतांश सीसीटीव्हीची तांत्रिक माहिती तेथे नियुक्त असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांना नाही. सीसीटीव्हीचे चित्रीकरण होण्याच्या दृष्टीने योग्य दिशा किंवा अँगलमध्ये नाहीत. पाचोरा चाळीसगावकडे जाणार्या बसेसच्या टपा वरचेच चित्रण होते. दरवाजा, खिडक्यांजवळ किंवा अन्य ठिकाणी होणार्या हालचालींचे चित्रणच यात होत नाही. अशा अनेक तांत्रिक चुका असल्याने तक्रारी करूनदेखील कोणतीच कारवाई होत नसल्याने चोरट्यांंचेच भले होत आहे.