प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावतीत भाजपाचा ‘जागर जाणीवेचा’!

अमरावती : बदलापूर येथे झालेली दुर्दैवी घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा घटना होऊ नयेत म्हणून भाजपातर्फे आज महाराष्ट्रभर ‘जागर जाणिवेचा’ हे अभियान राबविण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी अमरावती येथील इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “केवळ  बदलापूरच नव्हे, जिथे कुठे अशा घटना घडतात त्या  राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाही. मानवतेला त्या काळिमा फासणाऱ्या असतात. ही प्रवृत्ती समाजाने ठेचून काढली पाहिजे. ” श्री बावनकुळे यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख, जयंत डेहनकर यांच्यासह सर्व प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

बदलापूर घटनेतील आरोपींला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारकडे केली असे सांगून बावनकुळे म्हणाले,  अशा संवेदनशील घटनांकडे राजकीय हेतुने पाहू नये. पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी काम करायला पाहिजे, त्या कुटुंबीयांना आधार द्यावा. राजकारण करण्यासाठी अनेक विषय आणि घटना असतात. अशा पद्धतीच्या अनेक घटना महाविकास आघाडीच्या काळातही  झाल्या, पण त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात असताना सरकारच्या पाठिशी राहण्याचे काम केले, अशी आठवण त्यांनी काढून दिली.