नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मोहिमेचा भाग असलेल्या दोन उपग्रहांचे अनडॉकिंग यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. अनडॉकिंग प्रक्रियेत अंतराळातील एसडीएक्स-१ आणि एसडीएक्स-२ उपग्रह यशस्वीरीत्या वेगळे करण्यात आले. इसोचे हे यश भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. या माध्यमातून इस्रोच्या भविष्यातील चंद्रमोहीम, मानवी अंतराळ आणि अंतराळ स्थानक उभारणीसारख्या मोहिमांचा मार्ग मोकळा झाला.
इस्रोच्या स्पॅडेक्स मोहिमेचा भाग असलेली अनडॉकिंग प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याच्या माहितीला केंद्र सरकारकडून गुरुवारी दुजोरा देण्यात आला. या यशाबद्दल विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान विभागाचे मंत्री जितेंद्रसिंह यांनी इस्रोचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिंब्यासाठी त्यांचे देखील आभार मानले आहेत.
गुरुवारी स्पॅडेक्स उपग्रहांनी डी-डॉकिंग पूर्ण केल्याबद्दल जितेंद्र सिंह यांनी इसोचे अभिनंदन केले. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, अभिनंदन टीम इसो. हे प्रत्येक भारतीयासाठी आनंददायी आहे. स्पॅडेक्स उपग्रहांनी अविश्वसनीय डी-डॉकिंग साध्य केले. यामुळे भारतीय अंतरिक्ष स्टेशन, चांद्रयान-४ आणि गगनयान यासारख्या महत्त्वाकांक्षी भविष्यातील मोहिमांच्या सुरळीत अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे उत्साह वाढत आहे.
मागील वर्षी ३० डिसेंबर रोजी स्पॅडेक्स मोहीम लाँच करण्यात आली होती. स्पॅडेक्स मिशन भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भेटी, डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने इस्रोकडून ही मोहीम राबवण्यात आली होती. जानेवारीच्या सुरुवातीला अचूक डॉकिंग प्रक्रिया समाविष्ट होती, जिथे उपग्रह सुरक्षित डॉकिंगपूर्वी १५ मीटर अंतरावरून एकमेकांशी संपर्क साधत होते.
अनडॉकिंग म्हणजे काय?
एखादे यान अंतराळ केंद्र किंवा दुसऱ्या यानाला जोडण्यासाठी किंवा त्यापासून विलग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला डॉकिंग आणि अनडॉकिंग म्हटले जाते. अनडॉकिंग म्हणजे, आधी जोडलेल्या दोन अंतराळ यानांना एकमेकांपासून वेगळे करण्याची प्रक्रिया होय. या प्रक्रियेत, यानांना एकत्र धरणाऱ्या यांत्रिक किंवा चुंबकीय लॉक सोडून, ते सुरक्षितपणे वेगळे होतात. अंतराळ यानांमध्ये सामान आणि सामग्रीची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच अंतराळ केंद्र आणि इतर यानांमध्ये ये-जा करण्यासाठी डॉकिंग आणि अनडॉकिंग प्रक्रिया आवश्यक आहे.