तरुण भारत लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय अनुदानित आश्रमशाळा वालंबा येथील विद्यार्थ्याचा शाळेसमोरील रस्त्यावर दुचाकीने जबर ठोस दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मदन रमेश पाडवी वय ९ असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना २० रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
वालंबा येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेत मदन रमेश पाडवी वय ९ हा दुसरीच्या वर्गात शिकत होता. दरम्यान, 20 डिसेंबर रोजी संध्याकाळचे जेवण आटोपून सुमारे साडेसहा वाजेच्या सुमारास जवळील रस्त्यावर पायी जात असताना अक्कलकुवा कडून मोलगी कडे जाणार्या भरधाव वेगातील दुचाकी (क्र.एम.एच.39, ए.एल.32 82) यावरील दुचाकीस्वाराने समोरून येणार्या दुचाकी (क्र. एम.एच.39,पी.27 53) हिला ठोस देवुन रस्त्याच्या कडेला पायी चालणार्या विद्यार्थ्यावर धडकल्याने या विद्यार्थ्याला ठोस देऊन गंभीर जखमी केले.
या विद्यार्थ्याला अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आश्रम शाळा प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करीत मुलाच्या मृतदेह अंतिम विधीसाठी घेण्यास नकार दिला, त्यानंरत पालकांची समजूत काढून संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्याच्या मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला.
एकुलता एक मुलगा
वडील रमेश सिंगा पाडवी यांचा एकुलता एक मुलगा असल्याने मुलाच्या अचानकपणे अपघाती मृत्यू झाल्याने पालकांनी हंबरडा फोडला होता मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे असून पुढील तपास फौजदार जितेंद्र महाजन करीत आहेत.