पाचोरा :-येथील हिवरा नदीपात्रात म्हैस चरताना विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.सदर घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून शेतकऱ्याचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील शेतकरी गोपीचंद भिकन पाटील यांच्या कडे 35 म्हशी असून म्हशींना सालदार म्हणून मुकेश रामचंद्र न्हावी यास कामासाठी ठेवले आहे. सालदार हा दररोज सकाळी11 वाजता म्हशी चारण्यास घेऊन जात असे व सायंकाळी 5 वाजता परत घरी घेऊन येत असे दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी म्हशी चारण्यासाठी घेऊन गेला सायंकाळी 5 वाजता म्हशी चारून घरी आला असता एक म्हैस दिसून न आल्याने त्यास विचारले असता त्याने सांगितले की, मी पाचोरा शहरातील हिवरा नदीपात्रात म्हशी चारत होतो त्यावेळेस म्हैस कुठेतरी राहून गेली असे सांगितल्याने हिवरा नदीपात्रात म्हशीचा शोध घेण्यात आला असता दि.22 सप्टेंबर दुपारी एक वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील श्रीराम मंदिर जवळील हिवरा नदीपात्रातील विहिरीतील पाण्यात म्हैस तरंगताना मृतावस्थेत आढळून आली .
या घटनेप्रकरणी गोपीचंद पाटील यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दाखल केल्याने नोंद घेण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व विहिरीतील म्हशीला बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले तसे 95 हजाराचे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गोपाल जाधव हे करीत आहे.
हिवरा नदीपात्रात बेकायदेशीर विनापरवाना विहिरी खोदून त्या विहिरीतून स्वतःच्या स्वार्थासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाणी उचलले जात आहे.यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.सदरील घटना पाहता संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून सदर विहिरीचे खोदकाम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
घटना पाहता नदीपात्रातील विहिरी ह्या बुजण्यात याव्यात सुदैवाने या विहिरीत म्हैस पडली एखाद्याचा बळी देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून हिवरा नदीपात्रातील विहिरी बुजण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे