तळोदा : तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गढीकोठडा गावाजवळील नाल्यात मासे पकडताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला. राकेश पावरा (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तळोदा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना ३१ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मयत युवकाचे वडील सुकन्या जंगल्या पावरा (रा. रोझवा पुनर्वसन, ता. तळोदा) यांनी तळोदा पोलिस ठाण्याला खबर दिली. त्यानुसार ३१ डिसेंबरच्या पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास गढीकोठडा गावाजवळील नाल्यात त्यांच्या मुलगा राकेश पावरा (२२) हा इतर तीन मित्रांसह मासे पकडण्यास गेला होता. तेथे विद्युत तारेवर आकडा टाकून मासे गढीकोठडा गावाजवळील पकडण्यासाठी तार पाण्यात सोडली. तेव्हा राकेश पावरा हा पाण्यात पडला व त्याला शॉक लागला.
त्यावेळी त्याचे मित्र किमसिंग पावरा, दुधल्या पावरा, येथील विश्राम पावरा यांनी त्याला तत्काळ बाहेर काढले आपल्या मोटारसायकलवर तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांनी त्यांची तपासणी करून त्यास पहाटे साडेपाचला मयत घोषित केले. मयताच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून तळोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस कॉन्स्टेबल राजधर जगदाळे हे करीत आहेत.