---Advertisement---
---Advertisement---
सोयगाव : बैल चरविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा करुण अंत झाला. बैल चरत असताना भडकला, यावेळी हातातील कासरा गळ्यात आवळल्या गेल्याने तरुण शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (२८ जुलै) रोजी घडली. याप्रकरणी बुधवारी (दि.३०) दुपारी दोन वाजता घटनेचा महसूल विभागाने पंचनामा करण्यात आला. लखन नामदेव शिंदे (वय २४) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
सोयगाव तालुक्यातील पळाशी शिवारात गट क्र-३०५ मध्ये सोमवारी लखन शिंदे हा स्वतःच्या दोन्ही बैलांना शेताच्या बांधावर चरविण्यासाठी घेऊन गेला होता. दोघे बैल चरत असतांना त्यातील एक बैल अचानक उधळला. यामुळे, लखनच्या हातातील बैलाचा कासरा अचानक त्याच्या गळ्याशी आला. यामुळे त्याच्या गळ्याला घट्ट फाशी बसली. या दुर्दैवी घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, त्यास तातडीने बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. मंगळवारी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ असा परिवार आहे.याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.