---Advertisement---

दुर्दैवी ! वीज अंगावर पडली, क्षणात होत्याचं नव्हतं; गावात शोककळा

by team
---Advertisement---

मुक्ताईनगर  : तालुक्यातील पिंप्राळा येथे तरुणाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच अंत झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी १८  रोजी घडली.  मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची माहीती तालुका दंडाधिकारी, मुक्ताईनगर यांना कळविण्यात आली आहे. ईश्वर शांताराम सुशिर (वय-२२, रा. पिंप्राळा ता.मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पिंप्राळा गावात ईश्वर हा आई, वडील मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. ईश्वरचे कुटुंब शेतीकाम करून उदरनिर्वाह करीत आहे. आज रविवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा.चे सुमारास शांताराम सुशीर हे पिंप्राळा शिवारात शेतात कपाशी निंदणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले  विशाल व ईश्वर होती. शेतात निंदणीचे काम करीत असतांना दुपारी २ वाजेचे सुमारास अचानक पाऊस व विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यामुळे सुशीर परिवार घराकडे परतण्यासाठी निघाला.

यावेळी ईश्वर हा पुढे निघाला. तर थोड्यावेळाने शांताराम हे व विशाल असे शेतातील निंदणीचे साहित्य घेवुन घराकडे निघाले.  तेव्हा गावातील बाळु काशिनाथ घाईट याने दोघांना आवाज देवुन बोलवून घेत शांताराम यांना सांगितले की, तुमचा मुलगा ईश्वर याचे अंगावर विज पडल्याने तो तुमच्या शेतातील बांधावर पडलेला आहे. हे ऐकताच शांताराम हे व विशाल असे शेताच्या बांधावर धावले. ईश्वर हा जामिनीवर पडलेला दिसला. तो काही एक हालचाल करीत नव्हता.

यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने खाजगी वाहनाने कु-हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले.  तेथील डॉक्टरांनी ईश्वर सुशिर यास तपासुन तो मयत घोषित केले.  यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनने याबाबत पंचनामा करून शांताराम सुशीर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment