जळगाव : धुळे येथे मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा भेट घेऊन घरी परतत असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ घडली. शिवाजी नारायण पाटील ( वय ५०, रा. सावदे ता. भडगाव) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.
भडगाव तालुक्यातील सावदे येथील शेतकरी शिवाजी नारायण पाटील हे पत्नीसह धुळे येथे मुलीला भेटण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासासाठी निघाले असता पावसाची रिपरिप सुरू झाल्याने त्यांनी पत्नी छायाबाई यांना गावच्या बसमध्ये बसविले. स्वतः शिवाजी पाटील हे दुचाकीने भडगावच्या दिशेने निघाले. त्यांचा धुळे तालुक्यात फागणे गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली आहे.
आदर्श शेतकरी म्हणून त्यांचा सावदे गावात लौकिक होता. तर त्यांच्या पत्नी छायाबाई शिवाजी देसले पाटील या गावच्या पोलीस पाटील आहेत. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, १ मुलगा, १ मुलगी हे आहेत.