---Advertisement---
---Advertisement---
देवदर्शन घेऊन आपल्या मुलासोबत एक महिला घरी जाण्यासाठी निघाली होती. रस्त्याने जात असतांना चालत्या कारचा दरवाजा उघडल्याने स्कुटीस्वार महिलेला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला स्कुटीने जात असतांना चालत्या कारचा दरवाजा अचानक उघडल्या गेल्याने महिलेचा तोल जाऊन ती रस्त्यावर पडली. ती पडताच मागून येत असलेल्या बसने तिला चिरडले. यात या महिलेचा जागीच मृत्यू ओढवला. दरम्यान, महिलेसोबत असलेला तिचा मुलगा थोडक्यात वाचला आहे.
राजस्थानमधील उदयपूर शहरातील प्रतापनगर पोलीस स्टेशन भागात ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर बस आणि कार चालक दोघेही पळून गेले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव लाजवंती रामचंदानी असे आहे.
लाजवंती रामचंदानी ह्या उदयपूर येथील राजस्थान गृहनिर्माण मंडळ कॉलनीतील सेक्टर-४ येथे राहत होत्या. त्या आपला मुलगा समीरसोबत घाटा वली माताजींचे दर्शन घेऊन परतत होत्या. दोघेही प्रताप नगर पोलिस स्टेशनजवळून जात असताना चौकातून येणाऱ्या कारमध्ये बसलेल्या एका तरुणाने न पाहताच अचानकपणे गेट उघडले. यामुळे कारचे गेट थेट लाजवंती यांच्यावर आदळून त्यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्या.
लाजवंती ह्या खाली पडताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका खाजगी बसने त्यांना चिरडले. बस न थांबता त्यांना तुडवत पुढे निघून गेली. लाजवंती यांच्या डोक्याला जबर मार लागला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर आईला या अवस्थेत पाहून मुलगा समीर बेशुद्ध पडला आणि मदतीसाठी ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह एमबी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला, जिथे शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातानंतर कार आणि बस चालक दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. सध्या प्रताप नगर पोलिस स्टेशन सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहे आणि बस आणि कारची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.