धरणगाव : तालुक्यातील हिंगोणा येथे पतंग उडवणार्या दहा वर्षीय बालकाचा पतंगोत्सवादरम्यान तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी दोन वाजता घडली. अक्षय संजय महाजन (१०, रा.कळमसरे, ता.अमळनेर ह.मु. हिंगोणे ता. धरणगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. या संक्रांती सणालाच घडलेल्या दुर्घटनेमुळे हिंगोणे गावात शोककळा पसरली असून गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिंगोण्यात मकरसंक्रांती सणानिमित्त संजय महाजन (माळी) यांचा पाचव्या इयत्तेत शिक्षण घेणारा अक्षय (१०) हादेखील पतंग उडवत होता. मोठ्या आनंदाने तो पतंग उडत असल्याचे अनेकांनी पाहीले. आजचा दिवस आपल्यासाठी काय घेऊन आलाय याचे साधे भान त्याला नव्हते. पतंग उडवत तो इकडे तिकडे धावत होता अन एक क्षण असा आला की त्याचा तोल गेल्याने तो खोल विहिरीत पडला. मोठा आवाज झाल्याने काही जणांनी धावपळ केली. मात्र त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही. निरागस अक्षयची या घटनेत प्राणज्योत मालवली. गावात ही वार्ता कळताच ग्रामस्थांनी धाव घेत अक्षयला बाहेर काढले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. छोट्याशा हिंगोणा गावात या संदर्भात दिवसभर चर्चा सुरू होती.