Union Budget 2025 : सर्वांचे लक्ष लागून असलेला देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून यात गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या. शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प विशेष मानला जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2025-26 च्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री सीतारामन यांनी मध्यमवर्गासाठी ‘ड्रीम बजेट’ दिले आहे.
या अर्थसंकल्पात, वार्षिक उत्पन्नाची करमुक्त मर्यादा 12 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदार आणि नवतरुणांना लाभ होणार आहे. यामुळे त्यांच्या खिशात अधिक डिस्पोजेबल उत्पन्न येईल, ज्यामुळे देशात मागणी वाढेल आणि एमएसएमई क्षेत्राला चालना मिळेल. यातून रोजगार निर्मितीही होईल.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले कि , एमएसएमई क्षेत्रात देखील फायदा होणार आहे, आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या 36 टक्के आहे, हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असल्याने त्याचा विशेष फायदा होणार आहे. सर्वात महत्वाचे महाराष्ट्राला याचा फायदा होणार आहे, कारण महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल झाले आहे. स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगार निर्मिती होत आहे. या स्टार्टअप्सकरता 20 कोटींरुपयांपर्यंत क्रेडिट लिमिट करण्यात आली आहे याचा नवतरुणांना आणि स्टार्ट्सअप्सना खूप मोठा फायदा होणार आहे.
शेती क्षेत्रातही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. 100 जिल्ह्यांमध्ये शेती विकास कार्यक्रम, नवीन डाळी आणि तृणधान्य धोरणे, तसेच तेलबियांची 100% खरेदी केंद्र सरकार हमीभावाने करणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात पीपीपी योजनांसाठी नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे खाजगी क्षेत्राची गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अॅसेट मॉनिटायझेशनचे नवीन फ्रेमवर्कही सादर करण्यात आले आहे, ज्यामुळे गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवून ते इतर क्षेत्रांत वापरण्यास चालना मिळेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाला विकसित भारताचा अर्थसंकल्प म्हणून संबोधले आहे, जो देशाला गतीने पुढे नेईल आणि भारताला प्रगल्भ, सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे नेईल, असे ते म्हणाले.