बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अज्ञात व्हायरसने भयंकर कहर केला आहे. काही गावांमध्ये, विशेषतः बोंडगाव, कालवड आणि हिंगणामध्ये, नागरिकांच्या केसांची गळती होऊन टक्कल पडण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तीन दिवसांच्या कालावधीत टक्कल पडण्याच्या धक्कादायक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेगावमधील कुटुंबावर कुटुंब या व्हायरसने भयंकर कहर केला असून, पहिल्या दिवशी डोके खाजवणे, नंतर हातात सरळ केस येणे आणि तिसऱ्या दिवशी टक्कल पडणे अशी साखळी दिसून येत आहे.
हे सर्व प्रकार अचानक आणि अनपेक्षितपणे घडत असल्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. काही लोकांच्या मते, ही समस्या शाम्पू वापरामुळे होऊ शकते, परंतु यावर काही ठोस माहिती मिळालेली नाही. विशेष म्हणजे, ज्या नागरिकांनी कधीही शाम्पू वापरला नाही, त्यांच्याही केस गळत आहेत.
शेगाव तालुका शिवसेना प्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या गंभीर परिस्थितीचा त्वरित सखोल तपास करून उपचार शिबिरे राबवण्याची मागणी केली आहे. नागरिकांना अशा प्रकारच्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.