जळगाव/पुणे : सध्या राज्यातील तापमानाचा पार थोडा कमी झाला आहे. एकीकडे उन्हातून दिलासा मिळत असताना राज्यात पुन्हा गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील जळगाव जिल्ह्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे.
पुणे वेधशाळेने राज्यातील पुढील तीन- चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २५ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात आज २५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. तर जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला उद्यापासून म्हणजेच २६ एप्रिल ते २८ एप्रिल असे तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील तापमानात वाढ झाल्याने उकाड्याने जळगावकर हैराण झाला आहे. त्यात पावसाचा अंदाज वर्तविल्याने उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.