जळगाव : राज्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा (unseasonal rain alert) देण्यात आला आहे. अशात जळगाव जिल्ह्यात सोमवारी (५ मे) रात्री गारपीट आणि मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आणखी दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे होते. मात्र अवकाळी पावसाच्या सावटामुळे हवामानात पुन्हा बदल झाला आहे. सोमवारी वादळी वारा, गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अमळनेर तालुक्यात गारांमुळे केळी पिकांचे ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून, केळीची घडं जमीनदोस्त झाली. तसेच पिकांची कापणी काही दिवसांवर आलेली असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, हे नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे.
चाळीसगाव तालुक्यातील आडगाव परिसराला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले. काढणीवर आलेला शेतमाल व गुरांचा चारा कुट्टी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तर भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे पहाटे चार वाजता विजांच्या गडगडाटासह पाच ते दहा मिनिटे अवकाळी पाऊस झाला.
आणखी दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज
पिलखोड येथे नवीन निघालेल्या कांद्याचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उंबरखेडला विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. यामुळे मका, ज्वारी, बाजरीच्या कणसांना झाकणे अवघड झाले. चारा आणि कणसे ओली झाली. पारोळा तालुक्याच्या काही भागात सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास जोरात वादळा पाठोपाठ साधारणतः अर्धा तास वादळी पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात आणखी दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.