मेथी परिसरात अवकाळीचा तडाखा; पंचनामे करून तात्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी

---Advertisement---

 

शिंदखेडा तालुक्यातील मेथी परिसरात दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रांत अधिकारी शरद मंडलिक यांच्यासह तहसीलदार नितीन कुमार देवरे, तालुका कृषी अधिकारी नागरे, अप्पर तहसीलदार रावसाहेब घोलप, मंडळ अधिकारी दीपक येशी, ग्राम महसूल अधिकारी भूपेश कोळी आणि कृषी सहाय्यक संदीप वाघ यांनी मेथी, कामपूर, सोनशेलू आणि मांडळ या भागांना भेट दिली.

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांसह ज्वारी, बाजरी, कांदा, लिंबू आणि भाजीपाला पिकांना बसला आहे. विशेष म्हणजे पिकांची काढणी सुरू असतानाच हे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पपई आणि टरबूज यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी शेडनेट संरचनाही उद्ध्वस्त झाली आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाकडून त्वरित मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या अवकाळीमुळे वीज वितरण व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. २ एप्रिलच्या सायंकाळपासून खंडित झालेला वीजपुरवठा २४ तासांनंतरही पूर्ववत झालेला नव्हता. विखरण येथील उपकेंद्राच्या मुख्य लाईनचे पोल कोसळले असून तारा तुटल्यामुळे कामपूर, विखरण आणि सोनशेलू या गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून वीजेवर अवलंबून असलेले सर्व कामकाज ठप्प झाले आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज मंडळाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. नुकसानग्रस्त शेतांच्या बांधावर पाहणीदरम्यान ज्ञानेश्वर गिरासे, शुभम गिरासे, गोपाल गिरासे, जितेंद्र गिरासे, नरेंद्र धोबी, प्रवीण माळी, गणेश गिरासे, रावसाहेब धोबी, शहाणा गिरासे यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

  • मेथी व सोनशेलू येथील ज्या ज्या शेतकऱ्यांचे गारपिटीने व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले असेल त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा त्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याचं पंचनामा आपण राहणार नाही याची खात्री प्रशासनातर्फे मी देतो 
    भूपेश कोळी ग्राम महसूल अधिकारी मेथी सोनशेलू.
  • विखरन मंडळात सर्वात जास्त अवकाळी व गारपिटचा फटका बसला असून ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या सर्व बाधित शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश प्राप्त झाला असून सकाळपासून आम्ही मंडळातील सर्व गावात झालेल्या नुकसान पाहणीचे दौरे करत असून नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही याची काळजी घेण्याचा आदेश मी सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दिले आहेत.
    दीपक येशी मंडळ अधिकारी विखरण 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---