तरुण भारत लाईव्ह न्युज : सावकारी पाशातून शेतकर्यांची जमीन त्यांना परत देण्याचा ऐतिहासि क निर्णय देणारे जळगावचे उपनिबंधक संतोष बिडवई यांचा गुरूवारी मंत्रालयात सहकार मंत्री ना.अतुल सावे यांच्या हस्ते सत्कार झाला.
जळगावचे उपनिबंधक संतोष बिडवई यांनी बुधवारी एक महत्वाचा निकाल दिला आहे. रावेर आणि यावल तालुक्यातील नंदकुमार मुकुंदा पाटील, मुरलीधर सुदाम राणे, मुरलीधर तोताराम भोळे, मधुकर तुकाराम राणे, मुरलीधर काशिनाथ राणे, सुदाम तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी या सावकारांनी बेकायदा पध्दतीत मालमत्ता हडप केली होती. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात तब्बल 47 सुनावण्या झाल्या. यानंतर जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी 15 शेतकर्यांच्या हडप केलेल्या तब्बल 96 एकर जमीन परत करण्याचे निर्देश दिलेत.
जळगाव जिल्हा उपनिबंधकांनी केलेली ही कारवाई राज्यातील सर्वात मोठी मानली जात आहे. त्यांच्या या कारवाईचे सहकारमंत्री ना. अतुल सावे यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
अनेकांची फसवणूक
जिल्ह्यात विविध भागात अडचणीतील शेतकर्यांना पेरणी तसेच शेती कामांसाठी पैशांची गरज असते. नेमके हे हेरून सावकारी करणार्या काही धनदांडग्या व्यक्ती त्यांना पैसे देऊन त्यावर भरमसाठ व्याज आकारतात तसेच पैसे न दिल्यास जमिनी जप्त करतात. अशा अडचणींमुळे बर्याच वेळेस वैफल्यग्रस्त शेतकरी आत्महत्या करतात. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी ही कारवाई करून सावकारी पाशात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.